भुसावळ । भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागातील २१ वर्षीय तरुणाचा वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. भूषण उल्हास वावरे (वय २१, रा. गोपाळ नगर, डी.एल. हिंदी विद्यालयामागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या स्पष्टता नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत

प्राथमिक माहितीनुसार, भूषण वावरे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले असून त्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार नेमका अपघात आहे की अन्य काही घटना, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
नागरिकांच्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी
वॉटर पार्कजवळ एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
भूषण वावरे हा या परिसरात नेमका कधी आणि कोणासोबत आला होता, तसेच त्याच्यासोबत नेमके काय घडले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्यातून घटनेपूर्वीच्या हालचालींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर तपासाला अधिक दिशा मिळण्याची शक्यता आहे.














Discussion about this post