अमळनेर । अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. शेतात काम करत असताना अचानक आलेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडल्याने राकेश रतीलाल पाटील (वय ३२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत वेदनादायी बाब म्हणजे, ही संपूर्ण घटना आईच्या डोळ्यांदेखत घडल्याने, तो धक्का सहन न होऊन आई जागीच कोसळली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी राकेश पाटील हे त्यांची आई जनाबाई पाटील आणि काही महिला मजुरांसह गावापासून जवळच असलेल्या शेतात कापूस लागवडीच्या कामासाठी गेले होते. दुपारी १२:३५ वाजेच्या सुमारास अचानक हवामान बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची चिन्हे दिसू लागली.
पाऊस सुरू होणार असल्याने राकेश यांनी शेतातील दुचाकी रस्त्यावर आणली आणि आई व मजुरांनाही मुख्य रस्त्यावर येण्यास सांगितले. स्वतः राकेश पाऊस आणि वाऱ्यापासून बचावासाठी रस्त्यालगत असलेल्या एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली थांबले. मात्र, त्याच वेळी अचानक काळ आला; एक प्रचंड मोठी वीज थेट त्या लिंबाच्या झाडावर आणि झाडाखाली उभ्या असलेल्या राकेश यांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत गंभीररीत्या भाजल्याने राकेश यांचा जागीच मृत्यू झाला.
हा सगळा थरार आई जनाबाई यांच्या डोळ्यांसमोर घडला. डोळ्यांदेखत पोटचा गोळा गेल्याचं पाहून आई आणि मजूर महिलांनी एकच आक्रोश केला. या धक्क्यामुळे आई जनाबाई पाटील या जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या, ज्यामध्ये त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राकेश यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. राकेश यांचे वडील रतीलाल शालिग्राम पाटील हे गेल्या चार वर्षांपासून अर्धांगवायूने (पॅरालिसिस) ग्रस्त आहेत. त्यातच राकेश यांचा अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सकाळी घरून निघताना, “कापूस लागवड आटोपून लवकर घरी येतो, मग सोबत जेवण करू,” असे पत्नीला सांगून ते शेतात गेले होते. मात्र, काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत राकेश यांना खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या संदर्भात शहापूरचे पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात माहिती दिली. सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत राकेश यांच्या पश्चात वृद्ध आई, आजारी वडील आणि पत्नी असा परिवार आहे.















Discussion about this post