नवी दिल्ली । सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याची चर्चा असून, सध्याचे १५ टक्के आयात शुल्क थेट ६ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. हा निर्णय झाल्यास देशातील सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या प्रमुख सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर सुमारे १.६३ ते १.६४ लाख रुपयांच्या आसपास आहे. आयात शुल्कात ९ टक्क्यांची कपात झाल्यास २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे १४ हजार रुपयांपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरातही सुमारे १३ हजार रुपयांची कपात होऊ शकते.
सणासुदीपूर्वी ग्राहकांना दिलासा?
आगामी सण-उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता सरकार आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. भारत हा जगातील प्रमुख सोने आयातदार देशांपैकी एक असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने आयात केले जाते. आयात शुल्क कमी झाल्यास सोन्याची आयात तुलनेने स्वस्त होऊन बाजारातील पुरवठा वाढण्याची शक्यता आहे.
या निर्णयाचा परिणाम चांदीच्या दरावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सोने-चांदीशी संबंधित ETF गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
मात्र, आयात शुल्क कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी केवळ चर्चांच्या आधारावर निर्णय न घेता अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल. सरकारचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच सोन्याच्या दरात प्रत्यक्ष किती बदल होईल, हे स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post