जळगाव । जमीन मोजणीसंदर्भातील प्रकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याच्या प्रकरणात भुसावळ येथील दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील आणि भुसावळ शहरातील सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईमुळे भुसावळच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमीन मोजणीसंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जामध्ये काही त्रुटी असल्याने त्या दूर करण्यासाठी कार्यालयातील शिपाई सचिन पाटील याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवारी एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी भुसावळ येथील सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण या खासगी व्यक्तीनेही लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत शिपाई सचिन पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण या दोघांना अटक केली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जमीन मोजणीसारख्या शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्याच्या या प्रकरणामुळे भुसावळमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.














Discussion about this post