जळगाव । यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जळगाव शहरात आज, १७ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या कालावधीत १५ मिनिटांची कपात केली असून, आता नागरिकांना दीड तासाऐवजी एक तास १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जाणार आहे. वाघूर जलाशयातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती आणि शासनाच्या आदेशांचा विचार करून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
सध्या वाघूर जलाशयातून दररोज सुमारे ९० ते ९५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. जळगाव शहरात सध्या दोन दिवसांच्या अंतराने म्हणजेच तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि भविष्यातील संभाव्य टंचाई टाळता यावी, यासाठी पाणीपुरवठ्याच्या कालावधीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहन धुतले, रस्त्यावर पाणी मारले तर दंड!
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जलवाहिन्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच, आवश्यक ठिकाणी नळजोडण्यांना तोट्या बसवून पाण्याचा अनावश्यक वापर रोखण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासाठी किंवा रस्त्यावर पाणी मारण्यासाठी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याची नासाडी टाळण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाघूर जलाशयात सध्या किती पाणीसाठा?
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलाशयाची एकूण जलसाठा क्षमता २४९.९१८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या जलाशयात १७३.१७९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, तो एकूण क्षमतेच्या सुमारे ७० टक्के आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे.
यंदा कमी पावसामुळे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जळगावकरांनी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. दैनंदिन वापरात पाण्याची बचत करून अनावश्यक वापर टाळल्यास उपलब्ध जलसाठ्याचा अधिक काळ उपयोग होऊ शकतो.















Discussion about this post