मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुरुवातीला विलीनीकरणाच्या शक्यता फेटाळणारे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ७ नोव्हेंबर रोजी अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी इच्छा होती, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी २ नोव्हेंबर रोजी सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विलीनीकरणासाठी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाने हिरवा कंदील दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आमदारांच्या राजकीय गणिताची चाचपणी
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे, अशी दोन्ही गटांतील काही आमदारांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्ष एकत्र आल्यास अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, खासदार पार्थ पवार आणि आमदार जयंत पाटील यांच्यातही चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.
शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
दुसरीकडे, शरद पवार यांनी अद्याप विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतरही राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली असून त्यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार?
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी १० नोव्हेंबरनंतर शरद पवार यांची भेट घेण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीत विलीनीकरणाबाबत चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपची कथित अनुकूल भूमिका, आमदारांचा दबाव आणि शरद पवार यांची भूमिका या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार विलीनीकरणासाठी तयार होणार का? तसेच शरद पवार महाविकास आघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये सहभागी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post