महात्मा गांधी उद्यानात नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रंगली अविस्मरणीय संगीत मैफल
जळगाव : दीपावलीच्या प्रसन्न पहाटे सूर, स्वर आणि भक्तिरसाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी जळगावकर रसिकांना मिळाली. शास्त्रीय संगीताच्या सुरेल आलापांपासून नाट्यगीतांची भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि अभंग-भक्तिगीतांच्या भक्तिमय स्वरांपर्यंतच्या विविध संगीत प्रकारांनी महात्मा गांधी उद्यानाचा परिसर मंत्रमुग्ध झाला . निमित्त होते रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ संगीत सोहळ्याचे! नामवंत गायकांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत दीपावलीच्या पहिल्या सकाळी अविस्मरणीय स्वरानुभव घेतला.
आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर समिती प्रतिष्ठान, कै. नथ्यूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, ज्येष्ठ विधिज्ञ, पद्मश्री, खासदार ॲड. उज्ज्वल निकम, महापौर दीपमाला काळे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, दीपक चांदोरकर, पं. सुभाष दसककर आणि मेजर नाना वाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, रमेशदादा जैन, कॅप्टन मोहन कुलकर्णी, व्ही. एम. भट, पीयूष रावळ, स्वानंद झारे यांच्यासह शहरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मैफलीची सुरुवात आशिष रानडे यांनी रामकली रागातील बंदिश आणि ‘दीपावली सूरके संग…’ या सादरीकरणाने केली. त्यानंतर आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी ‘राधाधर मधुमिलिंद जय जय…’ ही रचना सादर करून वातावरणात भक्तिरसाची पेरणी केली. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘तेजो निधी लोहगोल’ या नाट्यगीताने आशिष रानडे यांनी रसिकांची विशेष दाद मिळवली.

अहिर भैरव रागातील, श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभलेले आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेले ‘राम का गुणगान…’ हे गीत आशिष रानडे आणि ईश्वरी यांनी सादर केले. प्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्या गायकीतून लोकप्रिय झालेली ‘हे शामसुंदर…’ ही रचना ईश्वरी दसककर-कदडी यांनी आपल्या सुरेल आवाजात पेश केली. तर पूजा दसककर यांनी ‘ये जवळी घे, जवळी घे सखया भगवंता…’ या गीतातून भक्तिभाव जागवला.
यमन रागावर आधारित ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या लोकप्रिय गीताला ईश्वरी आणि पूजा यांच्या सादरीकरणातून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीचे औचित्य साधत त्यांना समर्पित ‘शूरा मी वंदिले…’ हे गीत सादर करण्यात आले. आशिष रानडे यांनी ‘देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल… तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…’ या रचनेतून विठ्ठलभक्तीचा गजर केला.

‘आज अयोध्या सजली’, ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ आणि ‘राम राम भजो राम…’ या रचनांचा सुरेख संगम असलेले मेडले ईश्वरी आणि पूजा यांनी सादर केले. ब्रह्मानंद स्वामी लिखित ‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी’ या पदाने मैफलीत भक्तिसंगीताची उंची गाठली. ‘माझे माहेर पंढरी’, ‘भाग्यदा लक्ष्मी’ आणि कन्नड भजन अशा विविध भाषांतील व भक्तिपर रचनांनी कार्यक्रमात वैविध्यपूर्ण रंग भरले. अखेरीस ‘धन्यभाग सेवा का अवसर पाया…’ या भैरवीने या सुरेल मैफलीची भावपूर्ण सांगता झाली.
या संपूर्ण संगीत सोहळ्यात आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी गायनाची बाजू समर्थपणे सांभाळली. त्यांना पं. सुभाष दसककर (संवादिनी), सुजित काळे (तबला), विजय नेवे (सिंथेसायझर) आणि नितेश पाटील (ॲक्टोपॅड) यांनी प्रभावी साथसंगत केली. कार्यक्रमात सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपिका घैसास यांनी केले.















Discussion about this post