मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना सावरण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. खासदारांच्या बंडानंतर पक्षातील आमदार एकजूट दाखवतील, अशी अपेक्षा असताना चार आमदारांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
खासदारांच्या बंडानंतर पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि आमदारांशी थेट संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही आमदार गैरहजर राहिल्याने ठाकरे गटासमोरील अडचणी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खासदारांनंतर आता आमदारांमध्येही फूट पडणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
दरम्यान, बंडखोर सहा खासदार मुंबईत दाखल झाले असून ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांनी अद्याप त्यांच्या अनुपस्थितीबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय तर्क-वितर्कांना अधिक बळ मिळाले आहे. आगामी काही दिवसांत या आमदारांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post