राज्यात जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मान्सूनचे दमदार आगमन झालेले नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पेरण्या खोळंबल्याने बळीराजा आभाळाकडे आशेने डोळे लावून बसला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान प्रणालींचा अभाव असल्याने त्याची आगेकूच काही दिवसांपासून मंदावली आहे. विशेषतः अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास थांबला होता. मात्र आता परिस्थितीत बदल होत असून २५ जून ते १ जुलैदरम्यान संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, आज रायगड, रत्नागिरी, पुणे, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील इतर भागांत मात्र उकाड्याचा त्रास कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. व्यापक स्वरूपाचा पाऊस अद्याप अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पेरण्या रखडल्या; बळीराजाची चातकासारखी प्रतीक्षा
अनेक गावांमध्ये अधूनमधून किरकोळ सरी कोसळल्या असल्या तरी त्या पेरणीसाठी अपुऱ्या ठरत आहेत. परिणामी खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या असून शेतकरी दररोज पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस लांबल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांची पाणीपातळीही झपाट्याने घटत असल्याने चिंता वाढली आहे.
दुसरीकडे, पुढील चार ते पाच दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून येत्या आठवड्यात मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post