जळगाव | जळगाव विधान परिषदच्या एका जागेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत सुरू असून लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत आहेत.
या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानासाठी पात्र असून त्यामध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळी ८ ते १० या पहिल्या दोन तासांत २१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ३४.४४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, मतदान केलेल्या मतदारांमध्ये १०० पुरुष आणि ११७ महिला आहेत. त्यामुळे महिलांच्या सहभागाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ३१.७५ टक्के, तर महिलांची ३७.१४ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार चाळीसगाव येथे सर्वाधिक ६५.८५ टक्के मतदान झाले असून त्यापाठोपाठ पाचोरा येथे ५१.६७ टक्के, जळगाव येथे ४३.८७ टक्के, फैजपूर येथे ४०.५९ टक्के, एरंडोल येथे २५.३२ टक्के आणि भुसावळ येथे १८.६४ टक्के मतदान झाले आहे. तर अमळनेर येथे सर्वात कमी १०.५३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळच्या सत्रात अनेक केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. दिवसभरात मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत असून, या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post