नवी दिल्ली । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाने दिल्लीत बोलावलेल्या महत्त्वाच्या संसदीय बैठकीला लोकसभेतील ९ पैकी ६ खासदार गैरहजर राहिल्याने पक्षात पुन्हा फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संसदीय बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र, या बैठकीला केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन लोकसभा खासदार उपस्थित राहिले. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही बैठकीला हजेरी लावली.
दुसरीकडे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत.
कायदेशीर नोटीस आणि पक्षशिस्तीची कारवाई?
पक्षाने सर्व खासदारांना ई-मेल, व्हॉट्सॲप आणि दूरध्वनीद्वारे बैठकीची सूचना आणि व्हीप पाठवला होता. तरीही सहा खासदार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच संबंधित खासदारांना कायदेशीर नोटीस बजावण्याची तयारीही पक्षाकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील (पक्षांतरबंदी कायदा) तरतुदींनुसार संबंधित खासदारांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या पुढील भूमिकेनंतर स्पष्ट होणार आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर हे सहा खासदार एकत्र राहिले, तर लोकसभेतील ठाकरे गटाच्या दोन-तृतीयांश संख्याबळाचा आकडा पूर्ण होत असल्याने त्यांना स्वतंत्र गट स्थापन करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.
मात्र, या घडामोडींवर संबंधित खासदार किंवा शिंदे गटाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post