राज्यातील विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी ६ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या असल्या तरी नाशिकची जागा महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. जागावाटपात ही जागा शिवसेनेला देण्यात आली असताना भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
महायुतीकडे या मतदारसंघात स्पष्ट बहुमत असतानाही बंडखोर उमेदवाराची माघार घडवून आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे, “बहुमत असूनही महायुतीला स्वतःच्या मतदारांवर विश्वास नाही का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
गोकुळ गिते यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत महायुतीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. माघारीसाठी अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्या, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. नाशिकमध्ये येणारे मंत्री आत्मविश्वासाने येत असले तरी माघारी जाताना त्यांना निराशाच पदरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मंत्री मात्र “कार्यकर्ता दुरावू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत,” असे सांगत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत.
गिरीश महाजनांवर संशयाची सुई
गोकुळ गिते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या उमेदवारीमागे महाजन यांची भूमिका होती का, अशी चर्चा महायुतीच्या गोटात रंगू लागली आहे. यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याची माहिती समोर येत असून, या मुद्द्यावरून महायुतीत अंतर्गत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत बहुमत असूनही बंडखोरीमुळे महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली असून, पुढील काही दिवसांत गोकुळ गिते माघार घेतात की निवडणूक लढवण्यावर ठाम राहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post