मुंबई । आपल्या धडाडीच्या आणि शिस्तप्रिय कारभाराने नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेताच राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गुटखा, तंबाखू आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा मुंढेंनी दिला आहे. त्यावर, आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना तुकाराम मुंढेंकडून सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, या कारवाईंचं स्वागत करत तुकाराम मुंढेंचंही त्यांनी कौतुक केले आहे
तुकाराम मुंढे धडक कारवाई करत असतील तर चांगली गोष्ट आहे. अन्न आहे, दूध आहे, खायचे पदार्थ आहेत, या सगळ्यात भेसळ सर्रास होते हे सगळ्यांना माहिती आहे. मी स्वत: फोन करुन त्यांना सांगितलं की, दुधामध्ये भेसळ होतेय, कसले कसले केमिकल त्यात टाकले जातात. त्यामुळे, किडन्यांचे रोग वाढतात, म्हणून लोकांचं भविष्यच उध्वस्त होतं. तुम्ही यावर जास्त जोर द्या, जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा, असे सांगितल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
अन्न धान्य, औषधे यांमध्ये भेसळ करणाऱ्यांना मकोका लावायचा असेल तर लावलाच पाहिजे. कारण, तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही खोट्या औषधांतून लोकांचे जीव घेता, म्हणून अवश्य कारवाई करा, असेही सांगितल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.














Discussion about this post