जळगाव । शेतकरी कर्जमाफीतील अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
गिरीश महाजन म्हणाले की, रोहित पवार यांना सातत्याने माध्यमांमध्ये झळकायचे असते आणि सरकारच्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. “आंदोलनाचा अवघा एक दिवस झाला आणि ते झोपून गेले. आम्ही मात्र सलग बारा-बारा दिवस उपोषण करून आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनामागील वास्तव जनतेला चांगलेच कळत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
महाजन यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना, “आपल्या घरातील ज्येष्ठ नेत्यांना विचारा, त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केले?” असा सवाल उपस्थित केला. रोहित पवार यांच्या विधानांना जनता भुलणार नसून त्यांच्या राजकीय भूमिका केवळ दिखाव्यासाठी असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे राबवण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना त्याचा निश्चित लाभ मिळेल, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून विरोधकांकडून अनावश्यक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांच्या आंदोलनाला शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता, “राज्यात असे कोणतेही आंदोलन नाही ज्याला अजित नवले यांचा पाठिंबा नसतो,” असा उपरोधिक टोला महाजन यांनी लगावला.
कांदा उत्पादकांना मोठा दिलासा
यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी समाधानात आहेत. वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.















Discussion about this post