छत्तीसगड | छत्तीसगडमधील भाजपमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आल्याचे समोर आले आहे. डोंगरगड भागातील १०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जिल्हा संघटनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्ष नेतृत्वानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वावर मनमानी कारभार, गटबाजी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पक्षात स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांना आणि सूचनांना महत्त्व दिले जात नसल्याने नाराजी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घडामोडींची माहिती राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचा सन्मान राखत सर्वसमावेशक पद्धतीने निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गटबाजीचा आरोप; कार्यकर्त्यांचा संताप
राजीनामा देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष, गटबाजी आणि संवादाचा अभाव यामुळे नाराजी शिगेला पोहोचल्याने सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
पक्ष नेतृत्वाचा स्पष्ट संदेश
या प्रकरणानंतर राज्य भाजप नेतृत्वाने जिल्हा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखणे ही संघटनेची प्राथमिकता असल्याचे सांगत, स्थानिक परिस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, एखादा पदाधिकारी मनमानी करत असल्याचे आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यासही पक्ष मागेपुढे पाहणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
१०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे छत्तीसगड भाजपसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले असून, आता राज्य नेतृत्व हा असंतोष कसा दूर करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post