जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी ‘शेवटचे आणि निर्णायक आंदोलन’ छेडण्याची घोषणा करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. “या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर ते जातील,” असे म्हणत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या तब्बल ५८ लाख कुणबी नोंदी सापडूनही पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासनांवर ठेवत असून गेल्या तीन वर्षांपासून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी थेट प्रश्न विचारला. “हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत? नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्रे नाकारण्यामागचे कारण सरकारने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
तीन वर्षांच्या आंदोलनाचा निर्णायक टप्पा
२९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत, याच दिवशी अंतिम लढा उभारण्यात येणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. तीन वर्षांच्या संघर्षानंतर आता सरकारची कोणतीही टाळाटाळ किंवा दिशाभूल सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढून पात्र मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा २९ ऑगस्टचे आंदोलन राज्यभरात मोठ्या प्रमाणावर उभारले जाईल, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.















Discussion about this post