नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीवरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी प्रथमच सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावण्यात आल्याचे सांगितले. आपण जे बोललोच नाही, ते आपल्या वक्तव्याचा भाग असल्याप्रमाणे दाखवण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, न्यायालयीन कार्यवाहीतील काही क्लिप योग्य संदर्भाशिवाय सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्या. त्यांच्या टिप्पणीचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. “मी जे बोललो नाही, ते मी बोललो आहे, अशा पद्धतीने दाखवण्यात आले. माझ्या वक्तव्याचा गैरवापर करण्यात आला. देशातील तरुणांना भ्रमित करण्याचा हा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न आहे,” असे त्यांनी म्हटले.
सोशल मीडियावरील प्रसारावर नाराजी
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी माध्यमे, सोशल मीडिया आणि नागरिकांच्या जबाबदारीवरही भाष्य केले. चुकीच्या पद्धतीने वक्तव्ये प्रसारित केल्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. “आपण अधिकारांबद्दल बोलतो, तेव्हा जबाबदाऱ्यांबद्दलही बोलले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी लक्षात ठेवली पाहिजे. समाजात एकता कायम राहावी, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,” असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
‘कॉकरोच’ टिप्पणीवरून नेमका वाद काय?
१५ मे रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बनावट पदवीधारकांबाबत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या कथित ‘कॉकरोच’ टिप्पणीवरून वाद निर्माण झाला होता. या टिप्पणीचे व्हिडीओ आणि क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावर तरुणांमध्येही चर्चा सुरू झाली.याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉकरोच’ नावाचे अकाऊंट सुरू केले. त्याला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नावाने अभियान सुरू झाले.मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच स्पष्टीकरण दिले असून, न्यायालयीन टिप्पणीचा संदर्भ सोडून होणाऱ्या प्रसाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.














Discussion about this post