जामनेर । सिंचन विहिरीचे अनुदान मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जामनेर पंचायत समितीमधील एका कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित कर्मचाऱ्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाचे नाव आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याची जामनेर शिवारात शेती असून, त्यांच्या शेतात ‘मनरेगा’ अंतर्गत सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात एक सिंचन विहीर मंजूर झाली होती. विहिरीची अधिकृत स्थळपाहणी करण्यापूर्वीच संशयित सागर नावकर याने गावातील रोजगार सेवकाचा मध्यस्थ म्हणून वापर करत तक्रारदाराकडून आधीच ३० हजार रुपये उकळले होते. त्यानंतरच त्याने जागेची पाहणी करून फोटो काढले होते.
यानंतर तक्रारदाराला विहिरीच्या कामाचे ६०,९६६/- रुपयांचे अनुदान मिळाले. मात्र, पुढील अनुदान मिळवून देण्यासाठी नावकर याने “विहिरीची जागा बदलली आहे” असे कारण पुढे करत पुन्हा ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
सततच्या लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने ६ एप्रिल २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी (व्हेरिफिकेशन) केली. या पडताळणी दरम्यान संशयित सागर नावकर याने पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले.
लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर काल दि. २२ जून २०२६ रोजी संशयिताविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि भूषण पाटील यांच्या पथकाने केली.















Discussion about this post