मुंबई । गेल्या १५ दिवसांपासून अरबी समुद्रात एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनने अखेर पुढे वाटचाल सुरू केली आहे. या नव्या प्रगतीमुळे मॉन्सून आता पुणे, लातूर, धाराशिव आणि अलिबागपर्यंत पोहोचला असून, पुढील २४ तासात मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तो पूर्णपणे दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा मॉन्सूनने ४ जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ८ जूनपर्यंत तो तळ कोकणात दाखल झाला; मात्र त्यानंतर त्याची प्रगती जवळपास ठप्प झाली होती. आता अनुकूल हवामान निर्माण झाल्याने मॉन्सूनने तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड मार्गे महाराष्ट्राकडे आगेकूच केली आहे.
मॉन्सूनच्या विलंबामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र आता पावसाची स्थिती सुधारत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यासाठीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांत वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही गारव्याचा अनुभव आला.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह सुमारे २० मिनिटे मुसळधार पाऊस झाला. शेतकरी वर्गाला आणखी काही चांगल्या पावसाच्या सरींची अपेक्षा असून खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागांत पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असून अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी काही भागांत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post