जळगाव । जळगाव शहरात फसवणुकीची नवी क्लृप्ती वापरत चोरट्यांनी एका फळ व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीचा पाठलाग करून “तुमच्या कारमधून ऑइल गळत आहे” असा बनाव करत व्यापाऱ्याला खाली उतरवण्यात आले आणि त्याचवेळी कारमधील रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रामानंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ओमप्रकाश मंधान हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी असून गणपती नगर परिसरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दिवसाचा व्यवसाय आटोपून ते रोकड घेऊन कारने घरी जात होते.
दरम्यान, आधीपासूनच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून असलेल्या काही संशयितांनी त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. गणपती नगर परिसरात पोहोचताच चोरट्यांनी मंधान यांना कारमधून धूर निघत असून ऑइल गळत असल्याचे सांगत वाहन थांबवण्यास भाग पाडले.
गाडीत बिघाड झाल्याचा संशय आल्याने अनिल मंधान हे तातडीने कारमधून उतरून वाहनाची पाहणी करू लागले. याच क्षणाचा फायदा घेत चोरट्यांनी कारच्या मागील सीटवर ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून क्षणार्धात घटनास्थळावरून पलायन केले. काही क्षणांनी बॅग गायब झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post