जळगाव । जिल्ह्यासह शहरात उन्हाने अक्षरशः कहर माजवला असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. उष्णतेच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे.
१३ मेपर्यंतच्या हवामान नोंदींनुसार, जळगाव शहराच्या कमाल तापमानाची सरासरी तब्बल ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानात सरासरी ४ अंशांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक वाढत आहे. गरम वाऱ्यांमुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे बाजारपेठा, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस जळगावसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.















Discussion about this post