अमरावती | नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गादेवीच्या मूर्तीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघालेल्या पिकअप वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल ७ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव रेल्वे परिसरातील चॅनल क्रमांक ९७ जवळ हा अपघात झाला. पिकअप वाहनातून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन भाविक वर्ध्याकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. धडक इतकी भीषण होती की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालय तसेच सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे.
सध्या सावंगी येथील रुग्णालयात १९ जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आणखी सहा जणांवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील तसेच धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पोलीस तपास सुरू आहे. ट्रक चालकाचा निष्काळजीपणा, वाहनाचा वेग किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास करण्यात येत आहे.















Discussion about this post