जळगाव । चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ कारवाई करत बेकायदा शस्त्रांची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. संशयितांकडून तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांना काही जण मोटारसायकलवरून गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. हे शस्त्र विक्रीच्या उद्देशाने नेले जात असल्याचा संशय होता. माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिसांनी नाटेश्वर मंदिर परिसरात सापळा रचून संशयितांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यात तीन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली. यासोबतच शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी वापरली जात असलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली.
या कारवाईत साहील दगडू आवारे (१९), सौरभ संतुराम मोतीरावे (२३) आणि रोहित चंद्रकांत जुजगर (३०) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तिघेही पुणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या तीन गावठी कट्ट्यांची किंमत प्रत्येकी २५ हजार रुपये असून त्यांची एकूण किंमत ७५ हजार रुपये आहे. आठ जिवंत काडतुसांची किंमत ८ हजार रुपये, तर मोटारसायकलची किंमत ५० हजार रुपये आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९३/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहितेचे कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post