जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी “शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तरी आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार टीका करत शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी उद्योगांसाठी अखंडित वीजपुरवठ्याचे महत्त्व अधोरेखित करत उद्योजकांना वीज खंडित झाल्यास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे सांगितले.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “लाईट नसेल तर एक वेळ आम्ही शेतकरी म्हणून सहन करून घेऊ. पण उद्योजकांना विजेचा फार मोठा त्रास होतो. उद्योगाची वीज गेली तर उत्पादन थांबते, मजुरांना काम नसतानाही मजुरी द्यावी लागते आणि मोठे आर्थिक नुकसान होते. विजेच्या अडचणीमुळे नवीन उद्योग सुरू करण्यासही उद्योजक कचरत असतात.”
त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून हात जोडून विनंती करत, “उद्योजकांना कोणताही त्रास होऊ देऊ नका,” असेही आवाहन केले.
वक्तव्यावरून विरोधक आक्रमक
दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्री पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी केली. रोहिणी खडसे म्हणाल्या, “शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान त्यांचा अपमान तरी करू नका. विजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल आणि उद्योजकांना होऊ नये, असे असंवेदनशील विधान एका मंत्र्याने करणे अत्यंत चुकीचे आहे. भविष्यात अशी विधाने होऊ नयेत यासाठी सरकारने त्यांना समज द्यावी.”
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विरोधकांनी त्यांच्यावर शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. तर या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.















Discussion about this post