जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमळनेर तालुक्यातील नांद्री गावाजवळ जुन्या वादातून एका शेतकऱ्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शरद रतन पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अमळनेर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पाटील यांचा संशयित आरोपींसोबत अवैध वाळू वाहतुकीवरून वाद सुरू होता. वाळूच्या बेकायदा वाहतुकीबाबत त्यांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप आहे. नांद्री गावाजवळ त्यांना डंपरखाली चिरडण्यात आले. या घटनेत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील या चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेत वापरलेला डंपर जप्त केला असून, चालकाला अटक केली आहे.
तीन दिवसांपूर्वीच दिली होती जीवे मारण्याची धमकी
या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, मृत शरद पाटील यांनी घटनेच्या तीन दिवस आधीच संशयित आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्यामुळेच शरद पाटील यांना लक्ष्य करण्यात आले का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. डंपर चालकाच्या अटकेनंतर इतर संशयितांची भूमिका आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या तपासातून प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.















Discussion about this post