जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या दरोडा, गोळीबार आणि वाळू माफियांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोकर येथील बँक दरोडा, वरणगावजवळील फुलगाव येथे तरुणावर झालेला गोळीबार आणि अमळनेर तालुक्यातील नांद्री येथे शेतकऱ्याचा डंपरखाली चिरडून झालेला मृत्यू, या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय माझा जळगाव जिल्हा? वाळू माफिया आणि गुंड सरकारचे जावई आहेत का?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वरणगावजवळील फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका २८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले.
भोकर येथील बँक दरोड्याच्या घटनेचा उल्लेख करत रोहिणी खडसे म्हणाल्या की, दरोडेखोर स्थानिक नागरिकांना धमकावून दरोडा टाकतात. त्यानंतर नागरिकच त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याऐवजी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात, असा टोला त्यांनी लगावला.
अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील शेतकरी शरद पाटील यांच्या मृत्यूच्या घटनेवरही रोहिणी खडसे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्यामुळे शेतकऱ्याला धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, त्यावर केवळ अदखलपात्र नोंद करण्यात आली आणि एफआयआर दाखल करण्यात आली नाही, असा आरोप खडसे यांनी केला.
तक्रार करूनही योग्य कारवाई न झाल्याने अखेर वाळू माफियांनी शेतकऱ्याला डंपरखाली चिरडून ठार केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हरियाणा पासिंगच्या डंपरमधून अवैध वाळू वाहतूक?
जळगाव जिल्ह्यात हरियाणा पासिंगचे डंपर अवैधरीत्या वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. काही डंपरवर नंबर प्लेटही नसल्याचे त्यांनी म्हटले. आरटीओ विभागाच्या नाकाखाली अशा वाहनांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असेल, तर संबंधित यंत्रणा नेमकी काय करतेय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘हे वाळू माफिया सरकारचे जावई आहेत का? त्यांना एवढे पाठबळ कुणाचे?’ असा सवाल करत पोलिस प्रशासन, आरटीओ विभाग आणि सरकारच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला.
चार मंत्री असूनही जिल्ह्यात असुरक्षिततेचे वातावरण?
जळगाव जिल्ह्यात महायुतीचे आमदार आणि खासदार असून चार मंत्रीही जिल्ह्याला लाभले आहेत. असे असतानाही सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली. आज रस्त्यावर जाणाऱ्या सामान्य नागरिकावर गोळीबार होईल, त्याला डंपरखाली चिरडले जाईल किंवा दरोडेखोरांकडून त्याला लक्ष्य केले जाईल, अशी भीती निर्माण झाली असल्याचे त्या म्हणाल्या.















Discussion about this post