जळगाव जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून अनेक धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्प काठोकाठ भरले असून गिरणा आणि अंजनी धरणेही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण जलसाठा ६४.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ९९.२२ टक्के जलसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अंभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा आणि बोरी या पाच मध्यम प्रकल्पांनी १०० टक्के जलसाठा गाठत ओव्हरफ्लोची स्थिती निर्माण केली आहे. तर अंजनी धरणात ९९.११ टक्के जलसाठा असून तेही शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.
याशिवाय जिल्ह्यातील अनेक लघु सिंचन प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत. पाणलोट क्षेत्रात आगामी काळात पुन्हा दमदार पाऊस झाल्यास उर्वरित धरणांतील जलसाठ्यातही आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धरणांमधील समाधानकारक जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post