धुळे: संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यातही सध्या कडाक्याचे ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका आता जिल्ह्यातील पशुधनाला बसू लागला आहे. आधीच ‘बर्ड फ्लू’ आणि उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आलेले असताना, आता वाढत्या उन्हामुळे पशुपालकांसमोरही नवे संकट उभे ठाकले आहे. उन्हाचा त्रास होऊन जनावरे दगावण्याची भीती पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली असून, पशुपालकांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने माणसांप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अतिरिक्त उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असून त्यांची भूक मंदावली आहे. परिणामी, दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडल्यास त्यांना उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. यामुळे जनावरे आजारी पडून दगावण्याचा धोका अधिक वाढला आहे.
एकीकडे चाऱ्याचे वाढते भाव आणि दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे शेतकरी व पशुपालक आधीच आर्थिक विवंचनेत आहेत. त्यातच आता या कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘लाख मोलाचे’ पशुधन डोळ्यांदेखत आजारी पडत असल्याने पशुपालक चिंताक्रांत झाले असून प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय मदत पुरवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.















Discussion about this post