भुसावळ । अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या यावलच्या १९ वर्षीय तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रंगेहात अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भूषण शांताराम कोळी (वय १९, रा. पाडळसा, ता. यावल) असे आहे. या कारवाईत दोन गावठी पिस्तुले आणि एक धारदार गुप्ती जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १) रात्री सुमारे ८ वाजता एका वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. तत्काळ कारवाई करत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच संबंधित तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुले (मॅगझीनसह), सुमारे १३.५ इंच पाते असलेली गुप्ती आणि एक मोबाईल असा सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपीकडे या शस्त्रांसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५, ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीकडे एवढा शस्त्रसाठा कसा आला, त्यामागे कोणाचा हात आहे का, तसेच या शस्त्रांचा वापर कोणत्या हेतूसाठी होणार होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.














Discussion about this post