उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षात ओबीसी आणि दलित समाजाला योग्य मान-सन्मान तसेच प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बरेलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना पत्र पाठवून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पक्ष संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी ओबीसी आणि दलित समाजाला अपेक्षित सन्मान मिळत नसल्याचा आरोप केला. निवडणुकीतही या समाजांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. या कारणांमुळे पक्षात राहणे योग्य वाटत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी भाजपशी असलेले नाते तोडण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावरून दिले होते संकेत
धर्मेंद्र कश्यप यांनी ६ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर ‘टाटा, गुडबाय’ अशी पोस्ट करत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटोही त्यांनी आपल्या प्रोफाइलवरून हटवला होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. याच दिवशी त्यांनी कांशीराम यांना श्रद्धांजलीही वाहिली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.
धर्मेंद्र कश्यप यांच्या राजीनाम्यानंतर भाजपमधील विविध पदांवर कार्यरत असलेल्या त्यांच्या काही समर्थकांनीही सोशल मीडियावर राजीनामे जाहीर केले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच माजी खासदाराच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरील आव्हानांची चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र कश्यप यांच्या निर्णयाचा बरेलीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार आणि राजीनाम्यानंतर त्यांची पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post