नवी दिल्ली । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. जंतर-मंतर परिसरात आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आंदोलक जमले असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह विविध नेत्यांचा आंदोलनात सहभाग असल्याचे वृत्त आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकशाहीच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होण्यासाठी आपण कुटुंबासह जंतर-मंतरवर जाणार असल्याचे केजरीवाल यांनी यापूर्वी म्हटले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते.

ममता बॅनर्जीसह खासदारांवरही कारवाई
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार डेरेक ओब्रायन, प्रतिमा मंडल आणि डोला सेन यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ममता बॅनर्जी या बसथांब्यावर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यासह सहकाऱ्यांना साऊथ एव्हेन्यू परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
आंदोलनादरम्यान डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) कार्यकर्त्या नेहा बोरा यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नेहा बोरा यांना ज्या बसमधून नेले जात होते, ती बस कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनाही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात निदर्शने करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पंजाबमधील चंदीगड येथे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आणि विविध पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post