भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे पुन्हा उचलून प्रवाशांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने तातडीने तपास सुरू करून संबंधित विक्रेत्याला अटक केली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे झाली ओळख
घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामधून संबंधित विक्रेत्याची ओळख पटविण्यात आली आणि त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या स्वाधीन करण्यात आले असून रेल्वे कायद्यानुसार चौकशी सुरू आहे.
संबंधित स्टॉलवर टाकले सील
प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या स्टॉलवरील विक्री पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
ठेकेदारालाही कारणे दाखवा नोटीस
या प्रकरणात केवळ विक्रेत्यावरच नव्हे, तर संबंधित परवानाधारक ठेकेदारावरही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने ठेकेदाराला “कराराचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये?” अशी कारणे दाखवा नोटीस बजावत तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
परवाना रद्द होण्याची शक्यता
चौकशीदरम्यान ठेकेदाराचे उत्तर समाधानकारक न आल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असून त्याच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश रेल्वे प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.















Discussion about this post