भुसावळ तालुक्यातील फुलगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव स्कार्पिओने दिलेल्या जोरदार धडकेत एक वर्षीय चिमुकलीसह चौघांचा मृत्यू झाला असून, अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला आहे.
मृतांमध्ये विजय शंकर काळे (१९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (३०), विघ्नेश शंकर चव्हाण (१४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (१) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे मलकापूर येथील रहिवासी असून, मजुरीच्या कामानिमित्त वरणगाव-दीपनगर परिसरातील कपिलवस्तीनगर येथे वास्तव्यास होते.
शुक्रवारी दुपारी चौघे जण दुचाकीवरून लस्सी पिण्यासाठी बाहेर पडले होते. घरच्यांनी बाहेर न जाण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी तो न ऐकता घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मृत चौघे दुचाकी (एमएच २२ बीडी ३६८१) वरणगावच्या दिशेने जात असताना फुलगाव परिसरातील हिरा मारुतीजवळ समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओने (एमएच १९ ईव्ही ५३५३) जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडले.
अपघातानंतर स्कार्पिओ चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात शोककळा
एका क्षणात चार जणांचा, त्यातही एका निरागस चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नागरिकांकडून फरार चालकाला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.















Discussion about this post