जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. २७ जुलै रोजी जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ७ डंपर, ७ ट्रॅक्टर आणि १९.५० ब्रास अवैध वाळू असा ८८ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस दलाने महसूल विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली. अवैध वाळू उपसा, साठा आणि वाहतूक करणाऱ्यांवर एकाच दिवशी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव उपविभागातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दोन गुन्हे नोंदविण्यात आले. एका कारवाईत काळ्या रंगाचा टिप्पर आणि चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा डंपर ताब्यात घेण्यात आला. या दोन्ही कारवाया उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
फैजपूर उपविभागातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एक ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू जप्त केली. मुक्ताईनगर येथे अशोक लेलँड कंपनीचा डंपर आणि दोन ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली. सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही दोन आरोपींवर कारवाई करत डंपर आणि अवैध वाळू जप्त करण्यात आली. बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५८/२०२६ दाखल करण्यात आला. या कारवाईत निळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा डंपर जप्त करण्यात आला. तहसीलदार बोदवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
भडगावमध्ये दोन टिप्पर जप्त
भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत टीएटीए कंपनीचे दोन टिप्पर आणि २.५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
अमळनेरमध्ये सहा ट्रॅक्टर ताब्यात
अमळनेर उपविभागात पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा ट्रॅक्टर आणि ७.५० ब्रास अवैध वाळू ताब्यात घेतली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत २१.३७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
तीन उपविभागांत कारवाईची नोंद नाही
या विशेष मोहिमेदरम्यान भुसावळ, पाचोरा आणि चोपडा उपविभागांत अवैध वाळू वाहतुकीबाबत कोणतीही कारवाई नोंदविण्यात आलेली नाही.
अवैध वाळू माफियांविरोधात मोहीम सुरूच राहणार
ही विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक पोलीस पथके तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशा धडक मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.














Discussion about this post