अमळनेर । अमळनेर तालुक्यातील खेडी येथील श्याम सुनील पाटील (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नैराश्याला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २७ जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम पाटील यांच्याकडे अवघी दीड एकर शेती होती. यंदाचा खरीप हंगाम देखील हातातून जाण्याच्या मार्गावर असल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, या विवंचनेत ते सतत वावरत होते. त्यातच दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाल्यामुळे ते गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक नैराश्यात होते.
२६ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले. उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी अडीच वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post