मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत भेटीगाठी सुरू असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे २० ते ३० आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पक्षात तातडीच्या बैठका सुरू झाल्याची चर्चा आहे. याच घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांनी नंदुरबारचा नियोजित दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.
आदिती तटकरे यांचा दौरा अचानक बदलला
मंत्री आदिती तटकरे या नियोजित कार्यक्रमानुसार दिवसभर नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार होत्या. त्यानंतर रात्री उशिरा त्या मुंबईला रवाना होणार होत्या. मात्र, सुधारित दौऱ्यानुसार त्या दुपारी ४ वाजता नंदुरबारहून जळगावला रवाना होणार असून, तेथून विमानाने मुंबईला जाणार आहेत.
राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच आदिती तटकरे यांनी दौऱ्यात अचानक बदल केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आदिती तटकरे यांनाही फोन गेल्याची चर्चा असून, त्यानंतर त्यांनी तातडीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवारांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक
दुसरीकडे, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाई निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक आमदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होत असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी आतापर्यंत सात आमदार पोहोचल्याचे सांगितले जात असून, आमदार शंकर मांडेकर आणि चेतन तुपे यांचाही त्यात समावेश आहे. इतर आमदारही बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण करण्याबाबत आमदारांची भूमिका काय आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास आमदार तयार आहेत का, याबाबत त्यांची मते जाणून घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एकीकडे आमदारांशी संपर्क, दुसरीकडे नेत्यांच्या भेटीगाठी आणि महत्त्वाच्या बैठका, तर दुसरीकडे आदिती तटकरे यांचा अचानक बदललेला दौरा या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमके काय घडते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post