मुंबई । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी SRA घोटाळ्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. SRA घोटाळ्यात मुख्यमंत्री मर्जीतील बिल्डरांना वाचवत असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी का होत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, आपण लवकरच या प्रकरणात आणखी एक ‘बॉम्ब’ टाकणार असून, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी SRA घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या प्रकरणाची चौकशी का होत नाही? चौकशी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबईतील ज्या पॉश भागांमध्ये झोपडपट्ट्याच नाहीत, अशा ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दाखवण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला. अशा प्रकारचे सुमारे ३०० प्रकल्प असून, हा तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘हा विषय संपलेला नाही. मी वारंवार या प्रकरणाची आठवण करून देत आहे. मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेल, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
नैतिकदृष्ट्या प्रगल्भ मुख्यमंत्री असते, तर त्यांनी या ३०० प्रकल्पांना स्थगिती दिली असती, असेही राऊत म्हणाले. तसेच अजित पवार यांच्या मृत्यूबाबतच्या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
‘मफलर घेऊन बसले आहेत का?’
SRA घोटाळ्यावरून सरकारला घेरताना संजय राऊत यांनी ‘एका मफलरची किंमत किती?’ असा सवाल केला. ‘फार फार तर १० हजार रुपये असेल, आम्ही देऊ ना. एवढा मोठा घोटाळा सुरू असताना ते डोळ्यावर मफलर घेऊन बसले आहेत का?’ असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. SRAच्या नियमांमध्ये न बसणारे प्रकल्पही राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिथे झोपड्याच नाहीत, अशा जमिनी ताब्यात घेऊन प्रकल्प राबवले जात असल्याने मुंबईचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा राऊत यांनी केला.















Discussion about this post