मुंबई । दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली जात असतानाच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून विधानसभेतील राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फोन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आमदारांना प्रामुख्याने तीन प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांमध्ये सध्या पक्षासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत त्यांचे मत काय आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण योग्य वाटते का आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे का, याबाबत माहिती घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
या संपर्काबाबत काही आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य राजकीय समीकरणांबाबत हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटातील २२ आमदार शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा विषय संपल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्यांच्या पक्षाकडे सध्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
सुप्रिया सुळे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांची मते जाणून घेण्यासाठी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. आता या फोननंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची नेमकी भूमिका काय आहे आणि पुढील काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post