नवी दिल्ली : प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’चा परिणाम जगभरातील हवामानावर होत असतो. भारताच्या नैऋत्य मान्सूनवरही एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. सामान्यतः एल निनोच्या काळात भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, एल निनो म्हणजे हमखास कमी पाऊस असे समीकरण नसून समुद्र आणि वातावरणातील इतर घटकही मान्सूनची दिशा ठरवतात.
यंदा महाराष्ट्रासह देशाच्या पावसावर एल निनोचे सावट असतानाही आतापर्यंत मान्सूनची स्थिती तुलनेने समाधानकारक राहिली आहे. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान देशात सरासरी ६९४ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ५९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरातील पावसाची तूट १४ टक्क्यांवर आहे. हवामान विभागाच्या निकषानुसार २० टक्क्यांपेक्षा कमी तूट ही सामान्य पावसाच्या श्रेणीत येते. त्यामुळे सध्या देशातील मान्सून सामान्य असल्याचे चित्र आहे.
देशातील जवळपास ५६ टक्के भूभागावर सामान्य पाऊस झाला असून, ४४ टक्के भागात पावसाची कमतरता जाणवत आहे. चार प्रमुख हवामान विभागांचा विचार करता ईशान्य भारतात पावसाची तूट सर्वाधिक आहे. या भागात १,०७५ मिमी पावसाची अपेक्षा असताना ७९२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे येथे २६ टक्के तूट नोंदली गेली आहे.
वायव्य भारतातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले. या भागात ४८० मिमीच्या तुलनेत ४२९ मिमी पाऊस झाला असून, ११ टक्के तूट आहे. मात्र, मध्य भारतात मान्सूनची कामगिरी तुलनेने चांगली राहिली आहे.
एल निनोचा प्रभाव असूनही आतापर्यंत देशातील पावसाची स्थिती सामान्य राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील काळात तीव्र एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने मान्सूनच्या उर्वरित टप्प्याबाबत हवामान तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
आगामी काही आठवड्यांत पावसाचे प्रमाण कसे राहते, यावर शेती आणि जलसाठ्यांची स्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे एल निनोच्या सावटात उर्वरित मान्सूनकडे शेतकरी आणि हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post