नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. जंतरमंतरवरील आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारासह विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवेदन करणार असल्याची चर्चा होती. मात्र, विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे अमित शाह यांना निवेदन करण्याची संधी मिळाली नाही आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभेत उपस्थित झाले. दोन्ही नेते सभागृहात दाखल होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. अध्यक्षांकडून वारंवार शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र गोंधळ सुरूच राहिला.
20 जुलै रोजी जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. याशिवाय राम मंदिराशी संबंधित चोरीच्या मुद्द्यावरही गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करण्यात आली. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी मकर गेटजवळ निदर्शने केली. सरकारविरोधात घोषणाबाजी करत विविध मुद्द्यांवर विरोधकांनी आपला निषेध व्यक्त केला.
दरम्यान, यापूर्वी अमित शाह यांनी संसदेत कोणत्याही विषयावर चर्चेसाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, विरोधकांना चर्चा नको असून केवळ सभागृहात गोंधळ घालण्यातच त्यांना रस असल्याचा आरोप त्यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून संसदेत मोठा संघर्ष पाहायला मिळत होता. वारंवार होणाऱ्या गोंधळावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अमित शाह संसदेत उपस्थित असतानाही त्यांचे बहुप्रतिक्षित निवेदन होऊ शकले नाही. विरोधकांचा गोंधळ आणि घोषणाबाजी सुरूच राहिल्याने लोकसभा अध्यक्षांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. त्यामुळे अमित शाह यांच्या निवेदनाची प्रतीक्षा असतानाच पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला.















Discussion about this post