देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) लिपिक पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदाच्या तब्बल 9,124 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी SBIच्या अधिकृत भरती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक
SBI लिपिक भरतीसाठी उमेदवारांना ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करायचा आहे, त्या ठिकाणची निवडलेली स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित राज्यासाठीची भाषा आणि पात्रता निकष तपासणे महत्त्वाचे आहे.
वयोमर्यादा किती?
उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. OBC उमेदवारांना 3 वर्षे, SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार 10 ते 15 वर्षांपर्यंत वयाची सवलत दिली जाईल.
पगार किती मिळणार?
SBI ज्युनियर असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे. वेतनश्रेणी ₹24,050 ते ₹64,480 इतकी असून सुरुवातीचे मूळ वेतन ₹26,730 असेल. यासोबत महागाई भत्ता (DA) आणि इतर लागू भत्तेही मिळणार आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे एकूण मासिक वेतन सुमारे ₹46 हजारांपर्यंत जाऊ शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
SBIच्या या मेगाभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र पदवीधर उमेदवारांनी 31 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे बँकेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.















Discussion about this post