कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला असून, आगामी काळातील संघटनात्मक विस्तार, पक्षाची विचारधारा आणि देशव्यापी आंदोलनाची दिशा यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपके यांनी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत तो पक्षाचा सर्वात मोठा विजय असल्याचे सांगितले. “१२ वर्षांत जे कोणी करू शकले नाही, ते देशातील तरुणांनी करून दाखवले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला झुकावे लागले आणि हा आमचा मोठा विजय आहे. सरकारने निर्माण केलेली भीती आता संपली आहे,” असे ते म्हणाले.
सप्टेंबरमध्ये पक्षाची पुढील दिशा
दिपके यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात पक्षाची पुढील दिशा, भूमिका आणि संघटनात्मक आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच CJP ही संविधानाच्या मूल्यांवर चालणारी, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारी राजकीय चळवळ असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या संविधानिक मूल्यांवर आमचा पक्ष कार्य करेल. आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांवर लढा देऊ,” असेही त्यांनी नमूद केले.
डिसेंबरपासून देशव्यापी मोहीम
येत्या डिसेंबर महिन्यापासून ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने देशव्यापी जनसंवाद अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही दिपके यांनी केली. या मोहिमेद्वारे देशभर दौरे करून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि अडचणी जाणून घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण आणि बेरोजगारीचे प्रश्न केंद्रस्थानी
सरकारवर टीका करताना दिपके म्हणाले की, देशात शिक्षण, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवर कोणीही गंभीरपणे बोलत नाही. संसदेतही या विषयांवर चर्चा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. समाजातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून CJP देशभर जनजागृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पक्षाचा विस्तार, संघटन मजबूत करणे आणि नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यात येणार असल्याचेही अभिजीत दिपके यांनी सांगितले.















Discussion about this post