नवी दिल्ली : देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार E20 इंधनाच्या वापरावर भर देत असताना काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याला विरोध सुरू केला आहे. वाहनांच्या इंजिनवर होणाऱ्या परिणामांपासून ते इंधन धोरणापर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात असून, या पार्श्वभूमीवर आंदोलनाचीही तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारचा दावा आहे की, देशाचे आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि इंधन आयातीवरील मोठा खर्च वाचवण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. विशेषतः इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर पर्यायी इंधनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाचे समर्थन करत मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही इथेनॉल मिश्रणामुळे भारतातील पेट्रोलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.
सरकारच्या मते, इथेनॉलचा वापर वाढला नसता तर पेट्रोलचे दर आणखी वाढू शकले असते. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे आयातीवरील खर्च कमी होऊन देशांतर्गत इंधन धोरण अधिक सक्षम होत असल्याचा दावा केला जात आहे.
मात्र दुसरीकडे, E20 पेट्रोलमुळे काही वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो, अशी शंका व्यक्त करत विरोधकांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. या मुद्द्यावरून आंदोलन छेडण्याची तयारी सुरू असून, दिल्लीत संसदेवर मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
E20 पेट्रोलबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये मतभेद कायम असताना, आगामी काळात हा विषय आणखी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनधारकांमध्येही E20 इंधनाच्या वापराबाबत उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.















Discussion about this post