नवी दिल्ली । गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा विरोधामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ ओढवली असल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.
सीजेपी आणि आंदोलक विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटी यांसारख्या विविध राज्यांमध्ये तीव्रतेने उमटले होते. देशभरात केंद्र सरकारविरोधात वाढणारा असंतोष आणि आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहता, सरकारला अखेर नमते घेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.

धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया
राजीनाम्यानंतर बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जंतर-मंतरवर आणि देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये. देशाची एकता व अखंडता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा बहुमूल्य वेळ केवळ अभ्यास व करिअर घडवण्यावर खर्च करावा, याच उदात्त विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे सुपूर्द केला आहे.”
या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील आंदोलक विद्यार्थी आणि CJP कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.















Discussion about this post