वरणगाव | जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वरणगाव पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा तस्करीवर मोठा घाव घालत ५ लाख १७ हजार ८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील कपिलवस्ती परिसरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक केली जात आहे.
माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित सिल्व्हर रंगाची इनोव्हा (एमएच-२० बीडी-३०००) अडवली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. याप्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
घटनास्थळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. त्यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमान्वये पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार असा एकूण ५ लाख १७ हजार ८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.















Discussion about this post