मुंबई | शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केलेले आमदार सचिन अहिर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची एकमताने निवड निश्चित झाली. निवडीनंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध पक्षांच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांच्या नावाचे तीन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. भाजपचे प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेना (शिंदे गट)च्या मनीषा कायंदे यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवणारे प्रस्ताव मांडले.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ज. मो. अभ्यंकर यांच्या नावाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला होता. मात्र, विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवड बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यांनी विरोधी पक्षाला उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली.
त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सभागृहाची परंपरा आणि गौरव कायम राखण्यासाठी ज. मो. अभ्यंकर यांचा उमेदवारी प्रस्ताव मागे घेतला. पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी सभागृहात याबाबत अधिकृत घोषणा केली.
विरोधी उमेदवाराने माघार घेतल्यानंतर सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी त्यांना शुभेच्छा देत नव्या जबाबदारीसाठी यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या.















Discussion about this post