जळगाव | मुंबईहून अमृतसरकडे धावणाऱ्या 11057 अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीमध्ये बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. बोगीतून अचानक धूर बाहेर येऊ लागल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी घाबरून डब्यांमधून खाली उतरू लागले. मात्र रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत आग विझवली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजता अमृतसर एक्स्प्रेस जळगाव स्थानकावर आली असता तांत्रिक बिघाड झाला. रेल्वे रुळावरील एक धातूची ‘की’ उडून डीव्हीला आदळल्यामुळे एअर प्रेशर अचानक कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून सामान ब्रेक आणि जनरेटर कारचे ब्रेक एकाचवेळी कार्यान्वित झाले. अचानक निर्माण झालेल्या तीव्र घर्षणामुळे ब्रेक डिस्कचे तापमान वाढले आणि त्यातून आग भडकली.
घटनेनंतर जनरेटर बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागल्याने रेल्वे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. धूर पाहून अनेक प्रवाशांनी घाबरून धावाधाव केली. मात्र रेल्वे सुरक्षा कर्मचारी, स्थानकावरील कर्मचारी आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जनरेटर बोगीतील अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग काही मिनिटांत आटोक्यात आणण्यात आली.
यावेळी भुसावळ येथे ड्युटी पूर्ण करून इगतपुरी मेमूने घरी परतत असलेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव जळगाव स्थानकावर उतरले होते. त्यांनी ही घटना पाहताच तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एअर प्रेशर पूर्ववत करून रेल्वेची यंत्रणा सुरक्षितरीत्या सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
आग पूर्णपणे विझवल्यानंतर संबंधित बोगीची आणि संपूर्ण यंत्रणेची सखोल तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी सुमारे ८.१५ वाजता अमृतसर एक्स्प्रेसला भुसावळच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवाशांना दुखापत झाली नाही. रेल्वे प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे मोठा अपघात टळल्याने प्रवाशांनी रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले. या घटनेची नोंद घेत रेल्वे प्रशासनाकडून पुढील तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे














Discussion about this post