मुंबई । शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या जाहीर मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि बंडखोर खासदारांवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “माझ्यावर झालेले आरोप जर तुम्हाला खरे वाटत असतील, तर मला सांगा, मी आत्ताच पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. तुमच्यापैकी एका शिवसैनिकाला पुढे करा, तो पक्षप्रमुख होईल. पण ही सोन्यासारखी शिवसेना चोर आणि दरोडेखोरांच्या हातात जाऊ देऊ नका,” असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “माझ्या माणसाने एक बोट दाखवले तरी मी क्षणभरही पदावर राहत नाही, म्हणूनच मी मुख्यमंत्री पद सोडले. मला सत्तेचा मोह असता तर मी विधानसभेत जाऊन बसलो असतो. शिवसेनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून गेल्या १२ वर्षांपासून मी नेतृत्व करत आहे. मी कधीही संकटांना घाबरून पळणारा नाही, तर पहाडासारखा खंबीर उभा राहून जबाबदारी स्वीकारणारा माणूस आहे. पण माझ्यावर काम करण्याचा विश्वास जोपर्यंत तुमच्या मनात आहे, तोपर्यंतच मी या पदावर राहीन.”
न्यायव्यवस्थेवर आणि केंद्रीय मंत्र्यांवर टोलेबाजी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारवर खोचक शब्दांत टीका केली. “एका बाजूला सुप्रीम कोर्ट आणि कायदा मंत्री बॅटमिंटन खेळत आहेत आणि त्यात आमचे ‘शटलकॉक’ झाले आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता देशातील लोकशाही आणि शिवसेना टिकवायची की नाही, याचा विचार सर्व जनतेने आणि शिवसैनिकांनीच करावा, असेही ते म्हणाले
स्थानिक नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना थेट कानपिचक्या
बंडखोर खासदारांचा समाचार घेताना त्यांनी पक्षातील नेत्यांना स्वबळावर लढण्याचे आणि नेतृत्व करण्याचे आवाहन केले. “मी जिल्हा परिषद किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये मुद्दाम फिरलो नाही, कारण मला स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व उभे करायचे होते. तुम्ही आमदार आहात, खासदार आहात; आता तुम्ही जबाबदारीची धुरा घेणार आहात की नाही? नेतृत्व करा आणि निवडणुका लढवून जिंकून दाखवा,” अशा कडक शब्दांत त्यांनी मैदानात उतरण्याचे आदेश लोकप्रतिनिधींना दिले.
लाचार, गद्दार आणि भेसळयुक्त माणसे जर माझ्यावर आरोप करत असतील, तर त्यांना उत्तर देण्याचे काम आता शिवसैनिकांचे आहे, असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला.















Discussion about this post