चाळीसगाव । बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या खुनात झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. अक्षय भानुदास पाटील (वय २७, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) या तरुणाचा विटांनी मारहाण करून खून करण्यात आल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय पाटील याचे बसस्थानकाच्या मागील भागात दुकान लावण्याच्या कारणावरून निखील अजबे याच्याशी वारंवार वाद होत होते. गुरुवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निखीलने बोलावल्याचे सांगून अक्षय घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही.
दरम्यान, शुक्रवारी (दि. १९) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अक्षयच्या कुटुंबीयांना त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असता अक्षयच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापती झालेल्या दिसून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मांगारवाडी वाडा परिसरातील एका पडीक घरासमोर रक्ताचे थारोळे तसेच रक्ताने माखलेल्या विटांचे तुकडे आढळून आले. यावरून अक्षयवर विटांनी हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
या प्रकरणी मृताचे वडील भानुदास राजाराम पाटील (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण आणि हत्येचा घटनाक्रम उलगडण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे चाळीसगाव शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.















Discussion about this post