जळगाव | भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया देताना मंत्री महाजन यांनी संबंधित फोटो मॉर्फ करण्यात आल्याचा दावा केला असून, याप्रकरणी मुंबईत अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.
बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, “सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो बनावट असून तो एडिट करून तयार करण्यात आला आहे. हा फोटो कसा तयार करण्यात आला याची माहिती नाही, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मी उद्या मुंबईत तक्रार दाखल करणार आहे.”
संजय राऊतांच्या टीकेवरही दिले उत्तर
शिवसेना (ठाकरे गट) मधील खासदारांच्या बंडानंतर झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. “एका दिवसासाठी ईडी आणि सीबीआय माझ्याकडे द्या, मी गिरीश महाजन यांना फोडून दाखवतो,” असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.या वक्तव्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे. ते नेहमीच अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी विशेष लक्ष देत नाही.”
व्हायरल फोटोवरून विरोधक आक्रमक
दरम्यान, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मात्र हा फोटो खोटा आणि मॉर्फ केलेला असल्याचा दावा करत महाजन यांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणती भूमिका मांडणार, बंडखोर खासदारांवर, शिंदे गटावर की भाजपवर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजच्या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.














Discussion about this post